पुरुषोत्तम बेर्डेंची 'टूर' निघाली 

काजोल तरटे
सोमवार, 15 जानेवारी 2018

पुरुषोत्तम बेर्डे यांनी कलेच्या सर्वच प्रांतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चित्रपट व मालिका क्षेत्रात येण्यापूर्वी मराठी रंगभूमीला वेगळा आयाम देण्यात त्यांच्या कल्पक बुद्धीचा मोठा वाटा आहे. चाळीस वर्षांपूर्वी जी काही नाटके रंगमंचावर अवतरली त्यात 'टूरटूर' हे एक नाटक. ज्याचे लेखन, दिग्दर्शन इतकेच काय, तर संगीताची बाजूही बेर्डे यांनी सांभाळलेली होती. एक अजरामर कलाकृती म्हणून या नाटकाने मराठी रंगभूमीवर अधिराज्य केले. या नाटकाने फक्त प्रेक्षकच हसत ठेवले नाहीत तर यातील कलाकारांना व्यावसायिक क्षेत्रात स्थिरता मिळवून देऊन कलाक्षेत्र अधिक विकसनशील होईल, असे पाहिलेले आहे.

पुरुषोत्तम बेर्डे यांनी कलेच्या सर्वच प्रांतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चित्रपट व मालिका क्षेत्रात येण्यापूर्वी मराठी रंगभूमीला वेगळा आयाम देण्यात त्यांच्या कल्पक बुद्धीचा मोठा वाटा आहे. चाळीस वर्षांपूर्वी जी काही नाटके रंगमंचावर अवतरली त्यात 'टूरटूर' हे एक नाटक. ज्याचे लेखन, दिग्दर्शन इतकेच काय, तर संगीताची बाजूही बेर्डे यांनी सांभाळलेली होती. एक अजरामर कलाकृती म्हणून या नाटकाने मराठी रंगभूमीवर अधिराज्य केले. या नाटकाने फक्त प्रेक्षकच हसत ठेवले नाहीत तर यातील कलाकारांना व्यावसायिक क्षेत्रात स्थिरता मिळवून देऊन कलाक्षेत्र अधिक विकसनशील होईल, असे पाहिलेले आहे. ही थांबलेली टूर आता नव्या कलाकारांच्या संचात पुन्हा प्रवास करण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌च्या वतीने जे वर्षभर उपक्रम राबविले जातात, त्यात अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एक नाटक बसविले जाते. मुंबईसह भारताच्या अनेक प्रांतात त्याचे प्रयोगही केले जातात. यंदा श्री. बेर्डे यांच्या 'टूरटूर'ची वर्णी लागलेली आहे. द्वितीय वर्षातील एमएचे विद्यार्थी ही कलाकृती सादर करीत आहेत. पंचवीस कलाकारांचा ताफा या टूरसाठी सज्ज झालेला आहे. थिएटर आर्टचे संचालक प्रो. डॉ. मंगेश बनसोड यांनी ही टूर आयोजित केलेली आहे. सहभागी कलाकार 'टूर'चा आनंद घेत आहेत. 

कुमार सोहोनी यांची शंभरावी कलाकृती 
चित्रपट व मालिका यांच्यापेक्षा कुमार सोहोनी हे नाटकात अधिक रमलेले आहेत. त्याला कारण म्हणजे सामाजिक विषय ते उत्तम हाताळतात. 'सुखांशी भांडतो आम्ही', 'देहभान', 'जन्मरहस्य', 'कहानी में ट्विस्ट', 'मी रेवती देशपांडे', 'त्या तिघांची गोष्ट' ही नाटकांची नावे जरी आठवली तरी सोहनी यांच्या प्रगल्भतेची कल्पना येते. गेल्या चार दशकांच्या प्रवासात एकोणसत्तर प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके, सतरा मराठी चित्रपट, तीन टेलिफिल्म्स, दहा मालिका असा सर्जनशीलतेचा प्रदीर्घ प्रवास त्यांनी कलेच्या प्रांतात केलेला आहे. मोजके पण प्रभावशील नोंद घेणारी अशी त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. अशा या प्रवासात त्यांच्या दिग्दर्शनातील शंभरावी कलाकृती कोणती असणार, याची उत्सुकता त्यांना स्वतःला होती. तशीच प्रेक्षकांनाही होती. नुकताच मुंबईत कलामहोत्सव झाला. त्यात अभिराम भडकमकर या लेखकाने जाहीरपणे सोहोनी यांची शंभरावी कलाकृती माझीच असायला हवी, असा आग्रह बोलून दाखविला होता; पण प्रत्यक्षात मात्र अभिनेता आणि लेखक म्हणून परिचयाच्या असलेल्या किरण मानेने ही बाजी मारलेली आहे. प्रदीर्घ काळानंतर तो रंगमंचावर आला आहे. 'उलटसुलट' हे त्या नाटकाचे नाव. या नाटकात मकरंद अनासपुरे, किरण माने, समीर देशपांडे, कृतिका तुळसकर, तन्वी पंडित आदी कलाकार काम करीत आहेत. कुमार सोरोनी यांची शंभरावी कलाकृती आहे. 

अशोकचे नवीन नाटक 
लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता अशी चौफेर कामगिरी फक्त अशोक समेळ यांनी केलेली नाही; तर प्रत्येक कलाकृती ठाशीव आणि रेखीव होईल, असे त्याने प्रत्येक वेळी पाहिलेले आहे. 'कुसुम मनोहर लेले', 'सन्यस्त ज्वालामुखी', 'अश्रूंची झाली फुले', 'अवघा रंग एकची झाला' ही त्यांची नाटके प्रेक्षकप्रिय ठरलेली आहेत. मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचा प्रभाव हा अधिक राहिलेला आहे. प्रेक्षकांच्या अभिरुचीप्रमाणे नाटक बदलत गेले आणि संगीत नाटकाला उतरती कळा लागली.

संगीत नाटकावर श्रद्धा असणाऱ्या निर्मात्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे या कलेचे सातत्य राहील, असे पाहिले होते; पण प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद लाभत नव्हता. 'अवघा रंग एकची झाला' हे नाटक रंगमंचावर दाखल झाले आणि संगीत नाटकाला संजीवनी प्राप्त झाली. भारताबरोबर परदेशातही या नाटकाचे प्रयोग झाले. अर्थात या गोष्टीला काही वर्षे लोटलेली आहेत; पण यानिमित्ताने संगीत नाटकाचे सातत्य टिकून आहे. 'संगीत मत्स्यगंधा' हे त्यापैकी एक नाटक. आता यात 'संगीत शंकरा' या नाटकाची भर पडणार आहे. अशोक समेळ याने हे लिहिलेले आहे आणि त्याचे दिग्दर्शनही केलेले आहे. त्याच्या पूर्वीच्या नाटकात जुन्या संगीताचा मेळ घातला होता.

तसेच काहीसे याही नाटकाच्या बाबतीत होणार आहे. संगीत आणि गीताच्या क्षेत्रात नावाचे वलय असलेले प्रा. अशोक बागवे आणि नरेंद्र भिडे यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. नाट्यसंगीत म्हटल्यानंतर ज्यांची नावे आवर्जून पुढे येतात ती गौरी पाटील, चारुदत्त आफळे यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. हे वेगळे शिवधनुष्य पेलण्याची तयारी संध्या रोठे यांनी सांभाळलेली आहे. 

सायलीचे घवघवीत यश 
छोट्या पडद्यावर मालिकांची रेलचेल वाढल्यामुळे कलाकार, निर्माता, दिग्दर्शक यांच्याइतकेच लेखकांसाठीसुद्धा ते व्यवसायाचे साधन झालेले आहे. ज्यांनी आपली गुणवत्ता, वैविध्य लिखाणात दाखविले ते सर्व जण सातत्य टिकवून आहेत. रवींद्र मठाधिकारी या लेखकाने मराठीतील सर्व वाहिन्या इतके काय तर हिंदी झीसाठीसुद्धा वैविध्यपूर्ण लिखाण केलेले आहे. रवींद्रच्या 'फू बाई फू', 'सातशे साठ सासूबाई', 'रुंजी', 'कॉमेडी एक्‍स्प्रेस' या काही मालिका सांगता येतील. पुढची पायरी म्हणून रवींद्रने आपल्यातील निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला तपासून पाहण्यासाठी काही शॉर्टफिल्म्सचे कामही केले. अर्थात हे काम करीत असताना इतर तंत्रज्ञ, सहकारी मित्रांपेक्षा पत्नी सायली मठाधिकारी हिचे सहकार्य त्याला अधिक लाभले.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीने प्रतिवर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात. कल्पक आणि महत्त्वाकांक्षी असणाऱ्या दिग्दर्शक व निर्मात्यांसाठी ही स्पर्धा महत्त्वाची असते. भारताच्या अनेक राज्यांतून स्पर्धक या स्पर्धेत उतरत असतात. यासाठी 'वरवंटा' नावाची स्क्रीप्ट तयार झाली. सायलीने दिग्दर्शन करण्याची इच्छा दर्शविली आणि रवींद्रनेसुद्धा त्याला दुजोरा दिला. संकलन आणि छायाचित्रण अशी वेगळी बाजू रवींद्रने सांभाळली. महत्त्वाचे म्हणजे देशभरातून या लघुपटाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. सायलीचा हा पहिलावहिला पुरस्कार आणि तोही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्राप्त व्हावा, याचा या उभयतांना प्रचंड आनंद झालेला आहे.

संबंधित बातम्या