सोज्वळ बहू आणि महिला डॉनही... 

अरूण सुर्वे 
सोमवार, 15 जानेवारी 2018

'हाच सूनबाईचा भाऊ' या मराठी चित्रपटातून मी अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर दूरदर्शनवरील 'सुरभी' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केल्यामुळं प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर 'हम आपके है कौन?'मधील भूमिकेमुळे सोज्वळ बहू झाले. आता 'खिचडी'मध्ये महिला डॉनची भूमिका साकारत आहे. सांगतेय अभिनेत्री रेणुका शहाणे... 

'हाच सूनबाईचा भाऊ' या मराठी चित्रपटातून मी अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर दूरदर्शनवरील 'सुरभी' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केल्यामुळं प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर 'हम आपके है कौन?'मधील भूमिकेमुळे सोज्वळ बहू झाले. आता 'खिचडी'मध्ये महिला डॉनची भूमिका साकारत आहे. सांगतेय अभिनेत्री रेणुका शहाणे... 

माझं बालपण महाराष्ट्रातच गेलं. माझी आई शांता गोखले ही नामवंत लेखिका आणि कवयित्री आहे. तिनं काही चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या आहेत. मी शिक्षण घेत असताना नाटक किंवा चित्रपटांमध्ये अभिनय केला नाही. फक्त सायकॉलॉजीचा अभ्यास करीत होते. कालांतराने मला अभिनयाची आवड लागली आणि मी हळूहळू त्या क्षेत्राकडे वळले. माझ्या आईचा मनोरंजन क्षेत्राशी बरीच वर्षे संबंध आल्यानं मलाही या क्षेत्राची गोडी लागली. 

मी 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हाच सूनबाईचा भाऊ' या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 1993 ते 2001 या काळात दूरदर्शनवरील 'सुरभी' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केल्यामुळं मी प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर 'सैलाब', 'जीते हैं जिसके लिए', 'जिना इसी का नाम है', 'मेरे रंग में रंगनेवाली' आदी मालिकांमध्ये मी भूमिका साकारल्या. 2010 मध्ये मी 'झलक दिखला जा- 4' या नृत्यविषयक रिऍलिटी शोमध्ये सहभाग घेतला. त्याचबरोबर 'लेडीज फर्स्ट' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. मला सर्व मालिका आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करताना खूप मजा आली. 

छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर मी विविध प्रकारच्या भूमिका रंगविल्या. मला माझ्या सर्वच भूमिका आवडतात. मात्र सध्या 'खिचडी' या मालिकेच्या नव्या आवृत्तीत साकारत असलेली भूमिका मी आजवर कधीच साकारलेली नव्हती. ही भूमिका पडद्यावरील माझ्या 'एक आनंदी व्यक्ती' या प्रतिमेचा भंग करणारी आहे. वास्तव जीवनात मी अगदी वेगळीच असल्याने 'खिचडी' या विनोदी मालिकेत महिला डॉनची भूमिका माझ्या आयुष्यात एक ताजी झुळूक घेऊन आली आहे. 

जीवन जसं येईल, तसं ते स्वीकारायचं, हीच माझी आयुष्याबद्दलची भूमिका आहे. जीवनात आपल्याला अनेक आश्‍चर्याचे धक्के बसत असतात. त्यामुळं मी जीवनाला दैनंदिन स्तरावर सामोरी जाते. भविष्याच्या योजना आखत नाही. मला असे आश्‍चर्याचे धक्के बसलेले आवडतात. म्हणूनच 'खिचडी'त मला महिला डॉनची भूमिका रंगवायला मिळेल, अशी मी कधी कल्पनाही केलेली नव्हती. ही भूमिका स्वीकारावी की नाही, असा प्रश्‍न मला सुरवातीला पडला होता. पण मग मी विचार केला की आजवरची सोज्वळ बहूची आपली प्रतिमा बदलण्याची ही एक चांगली संधी आहे. विनोदी मालिकेत भूमिका साकारून बघावी, या हेतूनं मी ती स्वीकारली. लोक मला आजही 'हम आपके है कौन?'मधील पूजाच्या भूमिकेतच ओळखतात. मात्र आता प्रेक्षक मला एका वेगळ्या भूमिकेत लक्षात ठेवतील. ही भूमिका तशी धोकादायक; परंतु विनोदी आहे. मी माधुरी दीक्षितबरोबर एका मराठी चित्रपटातही भूमिका साकारत आहे. तिच्याबरोबर तब्बल 23 वर्षांनी पुन्हा अभिनय करताना खूप आनंदही होत आहे. 

दरम्यान, आशुतोष राणा यांच्याबरोबर माझं लग्न झालं, तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय असा आहे. आजपर्यंत आम्हा दोघांना एकत्र भूमिका कधीच मिळालेल्या नाहीत. पण भविष्यात तसं घडावं, अशी माला आशा आहे. तसेच सत्येंद्र आणि शौर्यमान या माझ्या मुलांचा जन्म हीसुद्धा अशीच संस्मरणीय घटना आहे.

संबंधित बातम्या