अस्वस्थ करणारा चित्रपट 

संतोष पाठारे
सोमवार, 15 जानेवारी 2018

हिटलरच्या छळछावणीतील ज्यूंवरील अन्यायाचे प्रखर दर्शन घडवणारा आणि आजही अस्वस्थ करणारा 'टू हाफ टाईम इन हेल' या युरोपियन चित्रपटावर टाकलेला हा कटाक्ष

हिटलरच्या छळछावणीतील ज्यूंवरील अन्यायाचे प्रखर दर्शन घडवणारा आणि आजही अस्वस्थ करणारा 'टू हाफ टाईम इन हेल' या युरोपियन चित्रपटावर टाकलेला हा कटाक्ष

मुंबईत होणाऱ्या 'थर्ड आय' आशियाई महोत्सवाने 16 वर्षांत आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मुंबईसह भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केले जातात; ज्यामध्ये प्रामुख्याने युरोपियन चित्रपटावर भर दिला जातो. 'थर्ड आय' महोत्सवात मात्र आशिया खंडातील चीन, जपान या प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीनंच भूतान, बांगलादेश, व्हिएतनाम, कझाकस्तान, इराक, अफगाणिस्तानमध्ये निर्माण होणाऱ्या दर्जेदार चित्रपटांचं प्रदर्शन केलं जातं. भूतानचा 'कप', इराणमधील माजिद मजिदीचे 'चिल्ड्रन ऑफ हेवन', 'बदाम', 'कलर ऑफ पॅरेडाइज्‌', चीनच्या ह्युयो जान्कीचा 'पोस्टमन इन द माऊंटन' हे अभिजातपट 'थर्ड आय'मुळे मुंबईकर प्रेक्षकांना पाहायला मिळाले. आशियाई देशांतील या चित्रपटांनी उमेदीच्या काळातील दिग्दर्शकांवर मोठा प्रभाव टाकला आणि मराठीतही इराणीयन वास्तववादाची छाप चित्रपटनिर्मितीवर पडली हे वास्तव कोणीच नाकारणार नाही. 'थर्ड आय'मधील लघुपट स्पर्धेमुळे आशियाई देशांतील वेगवेगळ्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये निर्माण झालेल्या लघुपटांना व्यासपीठ मिळाले. त्याचप्रमाणे महोत्सवादरम्यान होणाऱ्या ओपन फोरममुळे चित्रपटसृष्टीतील अनेक प्रश्‍नांच्या साधक-बाधक चर्चा चित्रपटकर्मी व प्रेक्षक यांच्यामध्ये घडून आल्या. 

'थर्ड आय'मधील युरोपियन कनेक्‍शन हा विभाग म्हणजे पाश्‍चिमात्य चित्रपटप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. आशियाई चित्रपटांतील आशयघनता, नवनवीन प्रयोग यांच्या बरोबरीनं युरोपातील एका देशातील अभिजात चित्रपटांचं प्रदर्शन करण्याच्या उद्देशानं हा विभाग 'थर्ड आय'मध्ये काही वर्षांपूर्वी समाविष्ट केला गेला. या वर्षीच्या 'थर्ड आय'मध्ये हंगेरियन मास्टर झोल्तान फाब्री यांच्या चित्रपटाचं प्रदर्शन 'युरोपियन कनेक्‍शन'मध्ये करण्यात आलं. झोल्तान फाब्री यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून त्यांनी दिग्दर्शित केलेले 'स्वीट ऍना', 'मेरी गो राऊंड' व 'टू हाफ टाईम इन हेल' हे चित्रपट आशियाई चित्रपट महोत्सवात दाखवले गेले. युरोपियन चित्रपटांचे चाहते व फिल्म सोसायटीचे सदस्य यांना झोल्तान फाब्री हे नाव नवीन निश्‍चित नाही. हंगेरीमध्ये दीर्घ काळ चित्रपटनिर्मिती करणाऱ्या झोल्तान फाब्रींना सर्वच मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सन्मानित करण्यात आलं. 

'रिक्विम' (1982) या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटाला बर्लिन महोत्सवात 'सिल्व्हर बेअर' पुरस्कारही मिळाला. दुसऱ्या महायुद्धानंतर बुडापेस्टमध्ये चित्रपटनिर्मितीचं प्रशिक्षण घेतलेल्या झोल्तान फाब्री यांनी त्यांच्या चित्रपटातून युद्धोत्तर काळातील समाजजीवनाचं प्रत्ययकारी चित्रण केलं. 

वर्गभेद, त्यातून कनिष्ठ वर्गाचं होणारं शोषण या विषयाभोवती फिरणारे त्यांचे 'स्वीट ऍना' व मेरी गो राऊंड' हे चित्रपट आजच्या काळातले वाटतात. 'टू हाफ टाईम इन हेल'ला तर प्रत्यक्ष दुसऱ्या महायुद्धाची पार्श्‍वभूमी आहे. जेते आणि शोषित यांच्यातील संघर्षाचं अत्यंत भेदक चित्रण करणारा हा चित्रपट युद्धपटांच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. 'टू हाफ टाईम इन हेल'वरून प्रेरणा घेऊन हॉलीवूड आणि आपल्या बॉलीवूडमध्येही चित्रपट निघाले. या सर्वच चित्रपटांनी 'ऑस्कर'पर्यंत मजल मारली; पण आज 55 वर्षांनीही 'टू हाफ टाइम इन हेल' प्रचंड अस्वस्थ करणारा अनुभव देतो. 

'टू हाफ टाईम इन हेल'ची कथा हंगेरीमधल्या युद्धकैद्यांच्या एका छळछावणीत घडते. संपूर्ण युरोप आपल्या टाचेखाली चिरडू पाहणाऱ्या हिटलरच्या नाझी सैन्याने छोटे छोटे देश काबीज केले होते. जर्मनीमध्ये ज्यूंचा संहार होत होता; परंतु त्याच्या बरोबरीनेच साम्यवादी विचारसरणीच्या लोकांची मुस्कटदाबीही नाझी सैन्य करतच होते. नाझी सैन्याच्या दहशतीपासून त्यांच्याच मित्रराष्ट्राची - इटलीची, सामान्य जनताही मुक्त नव्हती. हंगेरीतल्या अनेक साम्यवादी आणि ज्यूंची रवानगी छळछावणीत केली गेली होती. सक्षम कारावास, अपुरे अन्न व गोठवणाऱ्या थंडीत राहण्यासाठीची अपुरी व्यवस्था यामुळे छळछावणीतल्या कैद्याचं जगणं मुश्‍कीलच झालं होतं. अशा विपरीत परिस्थितीत राहणाऱ्या कैद्यांपुढे जर्मन अधिकाऱ्यांकडून फुटबॉल मॅच खेळण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येतो. निमित्त असतं सर्वेसर्वा हिटलर याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचं! खुद्द हिटलर जरी या फुटबॉल मॅचला उपस्थित राहणार नसला तरीही युद्धभूमीवर कार्यरत असणाऱ्या उच्चपदस्थ नाझी अधिकाऱ्यांचं मनोरंजन करणं हा मुख्य उद्देश या फुटबॉल मॅचच्या आयोजनामागे असतो. फुटबॉल मॅच म्हटलं की संघनिवड आली! 

छळछावणीतील कैद्यांमध्ये ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवलेल्या फुटबॉलपटू डिगोला पाचारण करण्यात येतं. या संघामध्ये ज्यूंचा समावेश नसावा ही एक प्रमुख अट असतेच. डिगो जर्मन अधिकाऱ्यांनी दिलेलं फुटबॉल मॅच खेळण्याचं आव्हान स्वीकारतो आणि त्याचबरोबर त्याच्याही काही मागण्या अधिकाऱ्यांपुढे ठेवतो. मॅच खेळायची म्हणजे संघाला सराव करण्यासाठी वेळ देण्यात यावा आणि नेहमीच्या कैद्यांना वेळोवेळी पौष्टिक आहार मिळावा. या त्याच्या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन जर्मन अधिकारी देतात. डिगोच्या संघात येण्यासाठी बहुतेक सर्व जण तयार असतात. नेहमीच्या श्रमातून होणारी सुटका आणि भरपेट आहार यासाठी कधीही फुटबॉल न खेळलेले कैदीही डिगोकडे संघात सामील करून घेण्यासाठी विनवण्या करतात; डिगोची मात्र खेळावर निष्ठा असते. मॅच खेळायची ती जिंकण्यासाठीच. या विचारावर ठाम राहून डिगो त्याच्या संघातील खेळाडूंची निवड करतो; प्रत्यही काही कैद्यांची नाराजीही तो ओढवून घेतो. 

सैनिकांच्या देखरेखीखाली डिगोच्या संघाचा सराव सुरू होतो. हिटलरचा वाढदिवस दोन दिवसांवर येऊन ठेपतो. याच वेळी डिगोच्या संघातील खेळाडू संधीचा फायदा घेऊन निसटण्याचा प्लॅन करतात. डिगोच्या नकाराला ते जुमानत नाहीत. अखेरीस डिगोलाही त्यांच्या या प्लॅनमध्ये सामील व्हावं लागते. दुर्दैवानं छळछावणीच्या परिसरातून निसटू पाहणारे कैदी पुन्हा जर्मन सैन्याच्या हाती लागतात. मृत्यूच्या टांगत्या तलवारीमुळे खेळाडूंचं मनोधैर्य खचून जातं; मात्र त्यांना वेळ साजरी करण्यासाठी मॅच खेळणं क्रमप्राप्तच असते. मैदानात हे खेळाडू उतरतात; पण पराभूत मनोवृत्तीनं! खेळ बघायला जमलेले त्यांचे कैदी मित्र त्यांना दूषणं देऊ लागतात. मॅचचं पहिलं सत्र संपतं; मात्र दुसऱ्या सत्रात जीवाची बाजी लावून डिगो आणि त्यांचे सहकारी खेळू लागतात. जर्मन संघटनेला आपला पराभव स्पष्ट दिसू लागतो. या क्षणाला संघभावना, खेळातील हार-जीत हे सगळं मागे पडतं आणि ठरतो तो केवळ शोषणकर्त्यांचा माज! कैद्यांनी खेळातही आपल्याला जिंकावं ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही आणि मग त्या मैदानावर कैद्यांच्या प्रेतांचा खच पडतो. 

'इन हेल'ला 'टू हाफ टाईम्स' ही फुटबॉलमधील संकल्पना दिग्दर्शक जोडतो आणि युद्धकैद्यांच्या वाट्याला आलेला विनाश आपल्याला अनुभवायला लावतो. कैद्यांच्या प्रेतांपुढे पडलेला फुटबॉल क्‍लोजअप जागतिक चित्रपटाच्या इतिहासात अमर झालाय आणि तो चित्रित करणारा झोल्तान फाब्रीही!

संबंधित बातम्या